अपेक्षेप्रमाणे लॉकडाऊन पुन्हा वाढवला गेला. प्रत्येक लोकडाऊनच्या वेळी केंद्र व राज्य सरकारांच्या तोंडी एक वाक्य असते. आज जीव वाचवणे महत्वाचे आहे. अर्थव्यवस्था नंतर सांभाळता येईल. सुरुवातीच्या काळात हे काही अंशी बरोबर असले तरी आज हा पर्याय आपली साचेबंद विचारसरणी दाखवतो. मी ह्या विचारसरणी ला "किंवा" चे गुलाम होणे म्हणतो. जीव हवा का रोजगार हा प्रश्नच आपल्यावर थोपलेल्या लॉकडाऊनला कारणीभूत आहे. असे म्हणतात की उत्तरापेक्षा प्रश्न महत्वाचा असतो. आपण जो व जसा प्रश्न विचारतो त्यावरच उत्तराची दिशा ठरलेली असते.
हे हवे का ते ह्या प्रश्नात एकच पर्याय बरोबर असल्याचे गृहीत धरलेले असते. अश्या प्रश्नाचे उत्तर शोधणे सोपे असते पण ते खचितच सर्वोत्तम असते. हे हवे आणी तेही, असले प्रश्नच आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. त्यांची उत्तरे शोधणे व अंमलबजावणी करणे कठीण असले, तरी अशीच उत्तरे मानवाच्या प्रगतीत मैलाचे दगड ठरतात.
पूर्वी गाड्या बनवताना कंपन्या विचार करीत - गाडी स्वस्त हवी की आरामदायक? काही कंपन्यांनी एक तर काहींनी दुसरा पर्याय निवडला. त्यातून गाड्यांच्या बाजाराचे ढोबळमानाने दोन गटात वर्गीकरण झाले. ह्या पर्याय निवडीने सरते शेवटी थोडीच माणसे पूर्णपणे संतुष्ट झाली. ह्याला काही अंशी टोयोटा ने लेक्सस ही गाडी बनवताना पहिल्यांदा छेद दिला. त्यांनी ठरवले की ही गाडी बनवताना OR च्या ऐवजी AND चा स्विकार करायचा. त्यामुळे luxury बरोबर fuel efficiency , comfort, safety इत्यादी घटकांचा संयुक्तिकपणे विचार केला गेला. इतक्या वर्ष्यांनी टोयोटाने दाखवलेल्या मार्गाने इतर कंपन्या चालल्या आहेत. त्या मुळेच आज ५-७ लाखांना मिळणाऱ्या गाड्यातही सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातात.
जसे टोयोटाच्या एका निर्णयाने इंजिन डिझाईन, मटेरियल सायन्सेस, सेफ्टी इत्यादी क्षेत्रात एकच वेळी उत्तरे शोधावी लागली तशीच आज कॉरोनच्या लढ्यात जीव वाचवणे आणी रोजगार वृद्धी करणे ह्या दोन्ही घटकांचा समावेश असलेले उत्तर शोधताना गव्हर्नमेंट, संशोधक, उद्योजक, कामगार, नागरिक व इतर सर्व समाज घटकांचे एकत्रित योगदान लागेल.
"किंवा"ची गुलामगीरी सोडून आपण "व" चा अंगिकार करू हीच ह्या महाराष्ट्र दिनी अपेक्षा.
- सुबोध गाडगीळ
Comments