सध्या ऑनलाईन पेटिशनची चलती आहे. तेव्हा मी पण ठरवले की त्याचा फायदा उठवायचा. मी पहिल्यांदा एक ऑनलाईन पेटिशन्स सुरु केली.
- माझा व्यवसाय चालत नसल्याने सरकारने मला दरमहा रु.५०००० द्यावे.
ह्या पेटिशन मध्ये मी कोरोना, सरकारचे ढिसाळ नियोजन, वाढती महागाई, इत्यादी २० कारणे लिहिली. माझ्यावर कसा अन्याय होतो आहे आणी त्याला मोदी कसे जबाबदार आहेत हे ही लिहिले. तसेच जर मला रु.५०००० देता येत नसतील तर ताबडतोब राजीनामा द्यावा हे ही नमूद केले. मी ती पेटिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर अपलोड केली. त्या बरोबर, मी त्याची लिंक माझ्या LinkedIn, फेसबूक, Whatsapp ग्रुप, ट्विटर व इतर नेटवर्क वर शेर केली. त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला माझ्या मुळे ५००-७०० लोकांचे कॉन्टॅक्ट मिळाले. त्यांचा ही धंदा चालला पाहिजे ना?
दोन दिवसात माझ्या काही मित्रांनी त्या पेटिशनवर सह्या केल्या. त्यांनी ती पेटिशन त्यांच्या मित्रांबरोबर शेर केली. त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ने आपुलकीने मला मदतीचा हात पुढे केला. त्यांनी विनासायास माझी पेटिशन माझ्या मोबाईल कॉन्टॅक्ट बरोबर शेर करण्याची तयारी दाखवली. मग काय मी माझ्या ३-४ हजार कॉन्टॅक्टला त्यांना सरळ ऍक्सेस दिला. दोन आठवड्यात ह्या पेटिशन वर ४३००० लोकांनी सह्या केल्या. एवढंच काय, माझ्या दुसऱ्या ई-मेल id वर अश्या प्रकारची पेटिशन मी सुरु करू शकतो असा फुकटचा सल्ला त्या पोर्टल ने मला दिला. मला जसा सल्ला त्यांनी दिला तास त्यांनी इतरांना ही दिला असणार. कारण माझ्याच पेटिशनचे क्लोन्स माझ्याकडे सह्यांची येऊ लागले. प्रत्येकाने आपापला व्यवसाय न चालण्यासाठी मोदींना जबाबदार धरले होते. एका वृत्तवाहिनीनी माझी मुलाखत घेतली. कोरोनाने प्राईम टाइम खाल्ल्यामुळे माझी मुलाखत रात्री ११.३० च्या स्लॉट ला गेली. मी थोडा खट्टू झालो. पण मी पण काही कमी नाही. माझ्या मुलाखतीची लिंक मी माझ्या नेटवर्क बरोबर शेर केली. त्या बरोबर माझ्या पेटिशनची लिंक शेर करायला मी शिकलो नाही.
माझ्या पोस्ट्सनी FB वर आग लावली. मग भक्त काय, गुलाम काय, कोमट पाणी काय, टरबूज काय, पप्पू काय, घरकोंबडा काय, फेकू काय......कंमेंट्स चा नुसता ऊत आला. महाराष्ट्र सरकारनी आम्हाला महिना रू.१००० व २ किलो तांदूळ देण्याचे घोषित करावे अशी मागणी त्या वृत्तवाहिनेनी त्यांचा इम्पॅक्ट दाखवण्यासाठी जोरात लावून धरली.
आज माझ्या पेटिशनला २ महिने झाले. हळूहळू सह्यांचा ओघ कमी होत गेला. वृत्तवाहिनीला ११.३० च्या स्लॉट ला नवी बातमी मिळाली. ऑनलाईन पोर्टलला ८-१० हजार नवीन लीड्स (बकरे) मिळाले. आणी माझा व्यवसाय? तो आता उत्तम चालला आहे. मी आता इतर लोकांना रु.४९९ मध्ये ऑनलाईन पेटिशन कशी करायची ह्या पासून सर्व चॅनेल्स प्रोमोशनला कसे वापरायचे हे शिकवतो. मे ९ पासून नवीन ब्याच सुरु होत आहे. आजच खालील लिंक वर क्लिक करून रजिस्टर करा.
- सुबोध
That's the state of the masses today...